पुणे: सांगवी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले असून पत्नी मृतावस्थेत आढळली आहे. नेमकं पतीने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली का? याचा तपास पोलीस करत आहेत. ही घटना आज (बुधवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली.

गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव शाम वाघेला (वय ५०) असे असून, त्यांच्या पत्नीचे नाव राजेश्री शाम वाघेला (वय ४५) आहे. राजेश्री यांचा मृतदेह घरी आढळला असून, त्यांच्या तोंडातून रक्तस्त्राव झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. प्राथमिक माहितीवरून पती-पत्नीमध्ये रात्री उशिरा वाद झाला होता.
शाम वाघेला हे आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याची माहिती समोर आली आहे. याच कारणावरून रात्री जोरदार वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. वादानंतर राजेश्री वाघेला यांनी आपल्या मुलीला फोन करून सर्व घडामोडींची माहिती दिली होती. त्यावर “उद्या सकाळी येऊन भेटते,” असे मुलीने सांगितले होते.
आज सकाळी मुलगी सांगवी येथील घरी पोहोचली असता, दरवाजा ठोठावूनही आतून काही प्रतिसाद मिळाला नाही. घाबरलेल्या मुलीने इतर नातेवाईकांना बोलावले. त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी समोरचे दृश्य अंगावर शहारा आणणारे होते. वडिलांनी गळफास घेतलेला होता आणि आई मृतावस्थेत आढळली होती.
या घटनेमुळे वाघेला दाम्पत्याच्या मुलींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वाघेला यांना दोन मुली असून दोघींचाही विवाह झालेला आहे. पती-पत्नी दोघेच सांगवी येथील घरात राहत होते. राजेश्री वाघेला या पिंपरीतील एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या, तर शाम वाघेला रिअल इस्टेट व्यवसायात कार्यरत होते.
या प्रकरणात नेमकं काय घडलं, पतीने पत्नीची हत्या करून आत्महत्या केली का, याचा तपास सांगवी पोलीस करत आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सांगितले की, “शाम वाघेला यांनी गळफास घेतला आहे. त्यांची पत्नी मृतावस्थेत आढळलेली आहे. ही हत्या आहे की आणखी काही, याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.”







