पुणे: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे चारही धरणांच्या पाणीपातळीत वाढ नोंदवली गेली असून, पुणेकरांवरील पाणीकपातीचे सावट लवकरच दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, रविवारी सायंकाळी एकूण ५.२० टीएमसी (हजार दशलक्ष घनफूट) असलेला पाणीसाठा, सोमवारी सकाळी ५.४५ टीएमसीवर पोहोचला आहे. केवळ एका रात्रीत सुमारे ०.२५ टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. विशेषतः घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी धरणांमध्ये जमा होत आहे.
पावसाची सद्यस्थिती:
रविवारी रात्री झालेल्या पावसाची नोंद पाहता, खडकवासला धरण क्षेत्रात ४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पानशेत आणि वरसगाव धरणांच्या पाणलोट क्षेत्रात प्रत्येकी ९३ मिमी पावसाने हजेरी लावली, तर टेमघर धरण क्षेत्रात ८० मिमी पाऊस झाला आहे. यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील ओढे आणि नाले पूर्ण क्षमतेने वाहत आहे.
आज सोमवार सकाळपासूनही पुणे आणि आसपासच्या परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस अशीच पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच धरणाच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे.






