Pune : पुणे रेल्वे विभागाने पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणात महत्त्वाची झेप घेतली असून, याचा थेट फायदा प्रवासी आणि उद्योग क्षेत्राला होणार आहे. विभागातील एकूण 925 किमी लोहमार्गापैकी तब्बल 588 किमी मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाल्याने रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत आणि वेगवान होण्याची अपेक्षा आहे.

पुणे विभाग हा मध्य रेल्वेचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. पुणे, दौंड, मिरज, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि शिर्डी यांसारख्या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या या मार्गांवर दररोज हजारो प्रवासी आणि मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होते. मात्र, यापूर्वी अनेक मार्ग एकेरी असल्याने गाड्यांना ‘क्रॉसिंग’साठी 1 ते 2 तास थांबावे लागत असे. त्यामुळे वेळेचा अपव्यय आणि उशीर हा कायमचा प्रश्न बनला होता.
दुहेरीकरणामुळे ही अडचण मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. आता गाड्यांना समोरून येणाऱ्या गाडीची वाट पाहण्याची गरज राहणार नाही, त्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. विशेषतः पुणे-मिरज आणि दौंड-मनमाड या व्यस्त मार्गांवरील काम पूर्णत्वाकडे गेल्याने गाड्यांचा सरासरी वेग वाढणार आहे.
याचा सर्वात मोठा फायदा उद्योग आणि शेती क्षेत्राला होणार आहे. मालगाड्यांची वाहतूक जलद झाल्याने उत्पादन बाजारात वेळेत पोहोचेल, ज्यामुळे व्यापाऱ्यांना 1-2 दिवसांची बचत होऊ शकते. यामुळे लॉजिस्टिक खर्चही कमी होण्याची शक्यता आहे.
सध्या काही मार्गांवर काम सुरूच आहे. अहिल्यानगर-बीड आणि लोणंद-फलटण हे मार्ग अद्याप एकेरी असले तरी त्यांचे दुहेरीकरणही युद्धपातळीवर सुरू आहे. वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेता, पुढील 2-3 वर्षांत संपूर्ण विभाग अधिक सक्षम करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.







