Pune News : पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव पार्कमधील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने शुक्रवारी दुपारी मोठी खळबळ उडाली. शुक्रवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हॉटेलच्या लँडलाईनवर अनोळखी व्यक्तीने फोन करून “हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे, तात्काळ हॉटेल रिकामे करा” अशी माहिती दिल्यानंतर व्यवस्थापनाने तातडीने पोलिसांना कळवले. काही क्षणांतच पोलीस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. (Pune News)

पोलिसांनी हॉटेलची कसून तपासणी केली असता हा कॉल पूर्णपणे खोटा असल्याचे समोर आले. त्यामुळे हॉटेलमधील कर्मचारी आणि ग्राहकांनी सुटकेचा श्वास सोडला. हा खोडसाळपणा कोणी केला आणि कोणत्या उद्देशाने केला याचा पुढील तपास सुरू आहे. अशा घटना वाढत असल्याने पोलिसांना सतर्क राहण्याचे आव्हान अधिकच वाढले आहे.
हॉटेलच्या सिक्युरिटी मॅनेजरने दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार ज्या मोबाईल नंबरवरून धमकीचा कॉल करण्यात आला होता. या नंबरचा मालक कोण आणि त्याचा हेतू काय, हे शोधण्याचे काम पोलीस करत आहेत.







