पुणे : येरवडा परिसरात (Pune News) राहणाऱ्या सुवर्णा रहा या महिलेचा (Pune Crime) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रवी साबळे आणि त्याचे वडील रमेश साबळे या दोघांना येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी सकाळी लोहगाव परिसरात सुवर्णाचा मृतदेह सापडला, त्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. (Breaking News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सुवर्णा आणि आरोपी रवी साबळे हे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. १४ नोव्हेंबर रोजी घरगुती वाद सुरू झाला. या वादाच्या दरम्यान मारहाण झाली आणि सुवर्णा यांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात मृत्यूचे कारण ब्लंट फोर्स ट्रॉमा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
घटनेनंतर आरोपींनी मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. १४ ते १५ नोव्हेंबर दरम्यान मध्यरात्री रिक्षामध्ये मृतदेह टाकून तो लोहगाव परिसरातील डम्पिंग स्पॉटवर फेकला. पोलिसांनी डम्पिंग स्पॉटवरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाद्वारे मृत महिला आणि आरोपींची ओळख पटवली. यानंतर दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू झाली आहे.
सदर प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी माहिती दिली की, आरोपींनी किरकोळ घरगुती वादातून ही हिंसा केली आहे. त्यांनी घटनेच्या सखोल तपासासाठी विविध तांत्रिक आणि सीसीटीव्ही पुरावे वापरले आहेत. सदर प्रकरणाने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.






