Pune News : चाकण-तळेगाव महामार्गावर महाळुंगे परिसरात आज एक भीषण अपघात झाला. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला टेम्पोने जोरदार धडक दिल्याने या अपघातात तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

चाकणकडून एमआयडीसीच्या दिशेने प्रवासी घेऊन जाणारी रिक्षा जात असताना तिचं पुढचं चाक अचानक तुटलं. त्यामुळे रिक्षाचं संतुलन बिघडलं आणि त्याच वेळी समोरून येणाऱ्या टेम्पोची रिक्षाला जोरदार धडक बसली. हा अपघात चाकण येथील कल्याणी हॉटेलजवळ झाला.
या अपघातात रामसुंदर राम खिलावन शाखेद आणि पिंटू राजन बिहारा या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तिसऱ्या मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. जखमी झालेल्या दोन जणांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातात रिक्षाचं मोठं नुकसान झालं आहे.
दरम्यान, चाकण परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांची संख्या मोठी आहे. नियमाप्रमाणे रिक्षात फक्त तीन प्रवासी असावेत, पण अनेकदा सात किंवा त्याहून अधिक प्रवासी रिक्षातून कोंबले जातात. यामुळे अपघातांचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे.
या घटनेनंतर अवैध प्रवासी वाहतुकीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






