Pune news : शहरात वाढत चाललेल्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि पुणे महापालिकेने बांधकाम क्षेत्रासाठी कडक निर्णय घेतला आहे. आता शहरातील सर्व बांधकाम प्रकल्पांवर हवा गुणवत्ता मोजणारे सेन्सर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे सेन्सर ठरावीक तांत्रिक निकषांनुसार आणि मान्यताप्राप्त कंपन्यांकडूनच घ्यावे लागणार आहेत. (Pune news)

या सेन्सरमधून मिळणारी हवा गुणवत्तेची माहिती थेट आणि प्रत्यक्ष वेळेत महापालिकेच्या केंद्रीय संकेतस्थळावर दिसणार आहे. महापालिका हद्दीतील सुरू असलेले तसेच नव्याने सुरू होणारे खासगी, सार्वजनिक, निवासी, व्यावसायिक आणि पायाभूत सुविधा प्रकल्प या आदेशाच्या कक्षेत येणार आहेत. शासनाच्या निर्देशानंतर पुढील १५ दिवसांत हे सेन्सर बसवणे सक्तीचे करण्यात आले आहे.
राज्यातील शहरांमध्ये पीएम २.५ आणि पीएम १० या सूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्यामुळे वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार आणि महापालिका विविध उपाययोजना करत आहेत. त्याचाच भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २ नोव्हेंबर २०२३ रोजी दिलेल्या आदेशानुसार, बांधकामस्थळी धूळ रोखण्यासाठी उपाय करणे आधीच बंधनकारक करण्यात आले होते. ‘एआरएआय’च्या २०२२ च्या अहवालानुसार पीएम १० धुलिकणांपैकी सुमारे २३ टक्के प्रदूषण बांधकाम क्षेत्रातून होते. त्यामुळे बांधकाम ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटिओरोलॉजी (IITM) यांच्या मदतीने विविध सेन्सर उत्पादकांचा अभ्यास केला. त्यांच्या तांत्रिक क्षमतेची तपासणी करून योग्य उत्पादने निश्चित करण्यात आली आहेत. याबाबत दोन महिन्यांपूर्वी बांधकाम व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांना माहिती आणि मार्गदर्शनही देण्यात आले होते.
महापालिकेच्या नव्या परिपत्रकानुसार, पुणे शहरात ५ हजार चौरस मीटर किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळ असलेल्या सर्व निवासी, व्यावसायिक, सार्वजनिक आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये पीएम २.५ आणि पीएम १० मोजणारे सेन्सर बसवावे लागतील. यासोबतच धूळ प्रदूषणाची पातळी दाखवणारी एलईडी इंडिकेटर यंत्रणाही अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे कामगार आणि प्रकल्प व्यवस्थापनाला तात्काळ उपाययोजना करणे सोपे होणार आहे.






