सासवड, ता. 07 : लग्नाला जाताना पत्नीने न विचारल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून सासरच्या मंडळीकडून जावयाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. भिवरी (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीत 20 मार्चला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध सोमवारी (ता. 06 एप्रिल) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम बाळु खेनट, सिंधुबाई बाळु खेनट (रा. जगतापवस्ती नीरा, ता. पुरंदर), व सोनाली म्हस्कु कटके (रा. भिवरी, ता. पुरंदर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर म्हस्कू पांडुरंग कटके (वय 41, रा. भिवरी) असे मारहाण झालेल्या जावयाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 मार्च 2026 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी म्हस्कू कटके यांनी आपली पत्नी सोनाली हिला “मला न विचारता लग्नाला का गेली?” असा जाब विचारला. याचा राग धरून पत्नीने तिचे माहेरचे लोक म्हणजे भाऊ आणि आईला बोलावून घेतले.
पत्नीने बोलावल्यानंतर मेव्हणा शुभम बाळू खेनट आणि सासू सिंधुबाई बाळू खेनट हे म्हस्कू यांच्या घरी आले. “तू माझ्या बहिणीला का त्रास देतोस? तुझे हातपायच तोडतो,” अशी धमकी देत शुभमने शिवीगाळ सुरू केली. यावेळी पत्नी सोनाली आणि सासू सिंधुबाई यांनी म्हस्कू यांचे दोन्ही हात पाठीमागून घट्ट धरून ठेवले, जेणेकरून त्यांना प्रतिकार करता येऊ नये.
दरम्यान, या संधीचा फायदा घेत मेव्हणा शुभम याने आपल्या हातातील लोखंडी गजाने म्हस्कू यांच्या डोक्यात पाठीमागून जोरदार प्रहार केला. तसेच डाव्या हातावर मारून त्यांचा हात फॅक्चर करून गंभीर दुखापत केली. घटनेनंतर जखमी म्हस्कू कटके यांनी सासवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी पत्नी, सासू आणि मेव्हण्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार गुन्हा (रजि. नं. १३८/२०२६) दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सासवड पोलीस करीत आहेत.







