राहुलकुमार अवचट

यवत: दौंड तालुक्यातील महत्त्वाच्या असलेल्या रस्तापैकी एक असलेल्या खामगाव फाटा ते खामगाव रस्त्याची दुरावस्था झाली असून दौंड तालुक्यातील रेल्वे पलीकडे आलेल्या गावांना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाशी तसेच पुरंदर, दौंड व शिरूर तालुक्यासह पुणे सोलापूर महामार्गाच्या उत्तर व दक्षिण बाजूला असलेल्या अनेक गावांना जोडणारा प्रमुख रस्ता म्हणून खामगाव फाटा ते खामगाव रस्ता हा महत्वाचा मानला जातो.
पुणे सोलापूर महामार्गावरून रेल्वे क्रॉसिंग करून उत्तर बाजूला असलेल्या अनेक शेतकऱ्यांना आपली अवजड वाहने नेहा करण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा असून खामगाव , राहू, तांबेवाडी, उंडवडी , लडकतवाडी, तांबेवाडी, पिंपळगाव आदी भागातील अनेक जण शेती, नोकरी व विविध कामांसाठी या मार्गावरून जात असतात तर अनेक विद्यार्थी शाळेसाठी खामगाव , उरुळी कांचन , हडपसर, पुणे सारख्या ठिकाणी शिक्षणासाठी दैनंदिन ये – जा करत असतात परंतु पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गापासून सुरू होणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी लहान मोठे खड्डे पडलेले असून खड्डे चुकविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे तर दुचाकी स्वरांना जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत आहेत.
खामगाव परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा व रेल्वे क्रॉसिंग असल्याने या रस्त्यावरून दररोजच अनेक वाहने ये – जा करत असल्याने या रस्त्यावर सतत रहदारी असते परंतु सध्या रस्त्याची दुरवस्था झाली असून खड्डे पडले असून दोन्ही बाजूला असलेल्या साईट पट्यांची देखील दुरावस्था झालेली असल्याने वाहन चालवणे जिकिरीचे बनले आहे. सातत्याने रस्त्यावर अपघाताचे प्रकार घडत असून या रस्त्यावर रेल्वे गेट असल्याने अनेक वेळा यामुळे आवश्यक ठिकाणी पोचण्यासाठी उशीर होत असल्याने अनेक वेळा अपघात घडत आहे तर अनेकांना पाठीचे आजार निर्माण होत आहेत.
खामगाव – गाडामोडी मार्गे पुणेसह हवेली , दौंड ,शिरूर, पुरंदर तालुक्यात जाणाऱ्या नागरिकांना हा जवळचा मार्ग असून या रस्त्याचा बोजवारा उडाल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे या रस्त्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे तरी खामगाव फाटा ते खामगाव रस्त्याची व साईट पट्ट्यांची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी तसेच खामगाव फाटा येथील रेल्वे उड्डाणपूल लवकरात लवकर व्हावा अशी मागणी नागरिक करीत आहेत






