लोणी काळभोर, ता. 26 : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयात रामनवमीचा रामजन्मोत्सव यंदा पारंपरिक विधी, भक्तिभाव आणि अभूतपूर्व उत्साहात गुरुवारी (ता.26) साजरा करण्यात आला. दिवसभरात लाखापेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्याने आणि शासकीय सुट्ट्यांमुळे यावर्षी भाविकांची संख्या नेहमीपेक्षा लक्षणीयरीत्या वाढली होती.

रामदरा शिवालयाचे संस्थापक 1008 देविपुरी महाराज उर्फ धुंदीबाबा यांनी सुमारे साठ वर्षांपूर्वी या तीर्थक्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली. तेव्हापासून येथे रामनवमीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा अखंड सुरू आहे. आज पहाटे पाच वाजता महामस्तकाभिषेकाने उत्सवाची सुरुवात झाली आणि श्रींची विधिवत आरती करण्यात आली.
दुपारी ढोल-ताशांच्या गजरात श्रीराम, धुंदीबाबा व मंगलपुरी महाराज यांच्या पादुकांची पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लोणी काळभोर, फुरसुंगी, पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा तसेच परप्रांतातून आलेल्या भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
दुपारी बारा वाजता महंत हेमंतपुरी महाराज यांच्या हस्ते रामजन्मोत्सवाची मुख्य आरती पार पडली. त्यानंतर भंडारा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. पाडव्यापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचीही आज सांगता झाली. रामजन्माच्या सोहळ्यानंतर भाविकांना भात, आमटी आणि बुंदीचा महाप्रसाद देण्यात आला. दर्शन आणि प्रसादासाठी आबालवृद्धांची मोठी गर्दी उसळली होती. भाविकांच्या सुविधेसाठी स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्न केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी वाहनतळाचे नियोजन केले, तर लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, पीएमपीएमएलकडून हडपसर-रामदरा मार्गावर जादा बससेवा सुरू करण्यात आल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला. तरीही काही ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने भविष्यात रस्ता रुंदीकरणाची आवश्यकता असल्याची चर्चा भाविकांमध्ये रंगली. सोशल मीडियावरील प्रचार, विविध माध्यमांतील प्रसिद्धी, रामनवमीची सुट्टी आणि परीक्षा संपल्याचा परिणाम म्हणून यंदा रामदरा येथे “न भूतो न भविष्यती” अशी भाविकांची गर्दी झाल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची अखंड रांग सुरूच होती.







