पुणे: पुणे (Pune News) महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. पुण्यात आपली ताकद टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीमुळे पुण्यातील राजकारणात आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. जागावाटपाच्या सूत्रानुसार, अजित पवार गट 125 जागांवर आपले नशीब आजमावणार आहे, तर शरद पवार गटाला 40 जागा देण्यात आल्या आहेत. ही युती प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युतीला तगडे आव्हान देण्यासाठी करण्यात आली आहे.

या दोन्ही पक्षांनी प्रभाग स्तरावर एक विशेष रणनीती तयार केली आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागात राष्ट्रवादीची पकड मजबूत करण्यासाठी अजित पवार गटाचे 3 आणि शरद पवार गटाचा 1 उमेदवार रिंगणात उतरवला जाणार आहे. प्रभाग स्तरावर आपली ताकद आणि राजकीय वर्चस्व कायम राखण्यासाठी शरद पवार गटाने हा विशेष प्लॅन आखला असून, यामुळे महापालिकेत राष्ट्रवादीची एकूण ताकद वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. निवडणुकीच्या या मैदानात आता एका बाजूला भाजप-शिंदे गट, दुसऱ्या बाजूला दोन्ही राष्ट्रवादी आणि तिसऱ्या बाजूला काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व मनसे अशी चुरस पाहायला मिळेल.
पुणे महानगरपालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी ही युती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सोमवारी रात्री उशिरा या सर्व जागावाटपावर आणि रणनीतीवर दोन्ही गटांच्या प्रमुख नेत्यांनी शिक्कामोर्तब केले. या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह दिसून येत असला तरी, अनेक प्रभागांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी आता मोठी चुरस निर्माण होणार आहे.







