Pune News: पुणे: महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील तरतुदी तसेच सुधारित नियमांनुसार जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक 23 मार्च 2026 रोजी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापना करण्यास मंजुरी देण्यात आली. हा निर्णय प्रशासकीय गरज आणि जनहित लक्षात घेऊन घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

या बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. काही अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून काहींची बदली इतर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अविनाश शंकरराव शिळीमकर यांची स्थानिक गुन्हे शाखेतून सायबर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमोद अंबादास क्षिरसागर यांना नियंत्रण कक्षातून स्थानिक गुन्हे शाखेत जबाबदारी देण्यात आली आहे.
सूर्यकांत कोकणे यांची सायबर पोलीस ठाण्यातून अर्ज शाखेत बदली झाली आहे. शंकर पाटील यांना कामशेत पोलीस ठाण्यातून वडगाव मावळ येथे पाठवण्यात आले आहे. तसेच ज्ञानेश्वर बाजगिरे यांना उरुळीकांचन येथून ओतूर पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे. आकाश पवार यांना कामशेत पोलीस ठाण्यात जबाबदारी देण्यात आली आहे.
याशिवाय सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन विठ्ठल कांडगे यांना नियंत्रण कक्षातून पारगाव पोलीस ठाण्यात पदस्थापना देण्यात आली आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ नवीन ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.






