पुणे: पुण्यातील (Pune News) खराडी भागात असलेल्या इस्टर्न मिडोज सोसायटीतून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका 11 वर्षांच्या मुलाला त्याच्या आई आणि वडिलांनी मिळून अमानुष मारहाण केली. या दोघांनी मुलाला प्लास्टिक स्टंप आणि लाटण्याने बेदम मारले, तसेच त्याला चटकेही दिले. याप्रकरणी खराडी पोलिसांनी आईसह वडिलांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

सोसायटीचे चेअरमन विश्वनाथ घुले यांना माहिती मिळाली की, एक 11 वर्षांचा मुलगा सोसायटीच्या गेटवर सुरक्षा रक्षकाच्या केबिनजवळ रडत आहे. घुले शहराबाहेर असल्यामुळे त्यांनी तत्काळ सोसायटीतील रहिवासी आनंद शिंदे यांना संपर्क केला. शिंदे यांनी मुलाची विचारपूस केली. मुलाने शिंदे यांना सांगितले की, त्याच्या आई-वडिलांनी त्याला मारहाण करून घराबाहेर काढले आहे.
मारहाणीचे भयानक व्रण मुलाच्या अंगावर स्पष्टपणे दिसत होते. जबर मारहाण केल्यानंतर त्याचे टी-शर्टही फाटलेले होते. आनंद शिंदे यांनी लगेच चाइल्ड हेल्पलाइन आणि पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच, काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीतून उघड झाले की, ही मारहाण करणारी महिला मुलाची सावत्र आई आहे. तिला तिच्या पहिल्या लग्नातून एक मुलगी आहे. किरकोळ कारणांवरून ती या अल्पवयीन मुलाला सतत मारहाण करत होती.







