पुणे: मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर प्रवास (Pune News) करताना बोरघाटातील वाहतूक कोंडी आता लवकरच इतिहासजमा होणार आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून आखलेला ‘मिसिंग लिंक’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. मात्र, २०२५ ची डेडलाईन उलटून २०२६ उजाडले तरी प्रवाशांना या मार्गासाठी आणखी किमान तीन महिने प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे समोर आले आहे.

बोरघाटातील तीव्र उतार आणि वळणे अनेकदा भीषण अपघातांना निमंत्रण देतात. त्यातच होणारी वाहतूक कोंडी प्रवाशांचा संयम पाहते. यावर तोडगा म्हणून ६,६९५.३७ कोटी रुपये खर्चून हा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प राबवण्यात येत आहे. हा मार्ग खालापूर टोलनाक्यापासून सुरू होऊन थेट लोणावळ्यातील सिंहगड कॉलेजपर्यंत पोहोचणार आहे.
-
वेळेची बचत: या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे अंतर ८ किलोमीटरने कमी होईल आणि प्रवासाचा वेळ किमान २५ ते ३० मिनिटांनी वाचणार आहे.
-
सर्वात उंच पूल: सह्याद्रीच्या रांगांमध्ये १३५ मीटर उंचीचा आणि ६४५ मीटर लांबीचा भव्य पूल उभारला जात आहे.
-
डोंगराच्या पोटात बोगदे: जमिनीपासून १५० मीटर खोलवर दोन समांतर बोगदे खोदण्यात आले आहेत. यातील एक बोगदा तब्बल ८.९२ किलोमीटर लांबीचा असून तो सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो.
कामाचा सद्यस्थिती आणि विलंब का?
डिसेंबर २०२५ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र भौगोलिक आव्हाने आणि पुलाच्या कामातील तांत्रिक गुंतागुंतीमुळे कामाला विलंब झाला आहे. सध्या पुलाच्या फिनिशिंगचे काम सुरू असून एप्रिल २०२६ पर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत प्रवाशांना जुन्या मार्गावरून प्रवास करावा लागणार आहे.





