पुणे: राज्यात (Pune News) सध्या महानगरपालिका निवडणुकांचे वातावरण तापले असून ठिकठिकाणी प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. या धामधुमीत आपला प्रचार आणि सभा अधिक भव्य दिसावी यासाठी उमेदवारांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. प्रभागातील पदयात्रा आणि सभांमध्ये गर्दी दाखवण्यासाठी आता अनेक राजकीय पक्षांनी चक्क भाडोत्री कार्यकर्त्यांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः पुणे, मुंबई आणि कल्याण-डोंबिवली यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये या भाडोत्री कार्यकर्त्यांची मोठी फळी सक्रिय झाली असून, त्यांना रोजंदारीवर कामावर ठेवले जात आहे. या निवडणुकीमुळे बेरोजगार तरुणांना आणि कामगारांना रोजगाराची एक वेगळी संधी उपलब्ध झाली असून, अनेक शहरांमध्ये हे चित्र सर्रास दिसत आहे.

या कामासाठी कार्यकर्त्यांना दररोज 800 ते 1000 रुपये मजुरी दिली जात आहे. केवळ रोख रक्कमच नाही, तर सकाळचा नाश्ता आणि दोन्ही वेळच्या जेवणाची सोयही उमेदवारांना करावी लागत आहे. विशेष म्हणजे जेवणामध्ये शाकाहारी किंवा मांसाहारी अशा आवडीनुसार मागणी केली जात आहे. ज्या उमेदवाराकडून चांगली सोय आणि जास्त मानधन मिळते, तिकडे जाण्याकडे या भाडोत्री कार्यकर्त्यांचा कल असल्याचे दिसून येते.
वाढत्या उन्हामुळे या कार्यकर्त्यांनी आता कामाच्या वेळाही ठरवून घेतल्या आहेत. दुपारी 1 ते 4 या वेळेत तीव्र ऊन असल्याने या काळात आम्ही प्रचार करणार नाही, अशी अट त्यांनी ठेवली आहे. त्यामुळे सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा अशा दोन सत्रांतच हे कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी होत आहेत. 15 मार्च रोजी होणाऱ्या मतदानापर्यंत ही स्थिती कायम राहणार असून, यामुळे उमेदवारांच्या निवडणूक खर्चात मोठी भर पडत आहे.







