पुणे: पुणे (Pune News) शहरात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, गुन्हेगारीने टोक गाठले आहे. नागरिकांना बाहेर जातांना भीती वाटत आहे. कारण भरदिवसा होणारे खून, टोळीयुद्धे पुण्यासाठी नित्याचे झाले आहेत. अशातच बाजीराव रोडवर दिवसाढवळ्या एका तरुणाची क्रूरपणे हत्या झाली. पुण्यातील या ताज्या हत्याकांडाने शहर पुन्हा एकदा हादरले आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीमुळे शहरातील नागरिक कमालीचे भयभीत झाले आहेत.

कायदा आणि सुव्यवस्थेचे 12 वाजल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाने तीव्र निषेध केला आहे. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राज्य सरकारवर तीव्र शाब्दिक हल्ला चढवला. ते म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था फक्त कागदावरच उरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात गुन्हेगारीने थैमान घातलेले असताना, दूर बिहारमधील पक्ष प्रचारात मग्न आहेत. शहरात खुलेआम खून आणि टोळीयुद्धे होत असताना प्रशासन केवळ झोपल्याचे सोंग घेत आहे.
याच पार्श्वभूमीवर, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अभिनव कला महाविद्यालयाच्या चौकात जोरदार निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
मुख्यमंत्र्यांना जर पक्ष प्रचारातच अधिक रस असेल, तर त्यांनी तात्काळ गृहमंत्रिपदाचा कार्यभार दुसऱ्याकडे सोपवावा, असे स्पष्ट मत जगताप यांनी व्यक्त केले.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या राजकीय आंदोलनामुळे, प्रशासनाला नागरिकांचे संरक्षण करण्यात अपयश आल्याचा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणात चर्चेत आला आहे.







