पुणे: सोन्याचे भाव सध्या गगनाला भिडले असताना पुण्यात (Pune News) माणुसकीचे दर्शन घडवणारी एक सुखद घटना समोर आली आहे. कचरा वेचण्याचे काम करणाऱ्या एका प्रामाणिक महिलेने कचऱ्यात सापडलेली १ तोळ्याची सोन्याची अंगठी तिच्या मूळ मालकाकडे सुपूर्द केली आहे. स्वच्छ सहकारी संस्थेच्या सभासद शालन लक्ष्मण वायला यांनी हा प्रामाणिकपणा दाखवला असून त्यांच्या या कृत्याचे संपूर्ण पुणे शहरात त्यांचे कौतुक होत आहे. बाजारात सोन्याच्या किमती वाढत असतानाही कोणताही मोह न बाळगता त्यांनी सर्वांना प्रेरणा देणारे काम केले आहे.

घरामध्ये कामाची खूप धावपळ होती. प्रियांका जगदाळे यांनी मुलाचा डबा भरताना आपली सोन्याची अंगठी काढून एका कागदात गुंडाळून ठेवली होती. मात्र, घाईमध्ये तो कागद कचरा समजून डब्यात फेकला गेला. काही वेळानंतर आपली लग्नाची आठवण असलेली १० ग्रॅमची अंगठी घरात कुठेच दिसत नाही हे लक्षात आल्यावर संपूर्ण जगदाळे कुटुंब चिंतेत पडले होते.
दरम्यान, कचऱ्याचे वर्गीकरण करतांना शालन लक्ष्मण वायला यांना अचानक कागदात गुंडाळलेली सोन्याची अंगठी सापडली. कोणताही मोह मनात न ठेवता शालन यांनी त्वरित जगदाळे कुटुंबाशी संपर्क साधला आणि अंगठी त्यांच्या सुपूर्द केली. आपली मौल्यवान वस्तू सुखरूप परत मिळाल्याने प्रियांका जगदाळे यांनी त्यांचे आभार मानले.







