पुणे : रुग्णांच्या आरोग्याशी गंभीर खेळ करणाऱ्या जेजुरी येथील इंडयूकेअर फार्मास्युटिकल अँड रिसर्च फाउंडेशन या औषध उत्पादक कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. हृदयविकार, मधुमेह आणि रक्तदाबासारख्या आजारांवरील औषधांमध्ये आवश्यक औषधी घटकच नसल्याचे तपासणीत समोर आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने कंपनीचा औषध उत्पादन परवाना रद्द केला असून उत्पादन, पॅकिंग आणि वितरण तातडीने थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे संबंधित कंपनीने पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयालाही औषधांचा पुरवठा केला होता. 4 नोव्हेंबर रोजी रुग्णालयातून सुमारे 1.72 कोटी रुपये किमतीचा अप्रमाणित औषधसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये हृदयविकार, रक्तदाब आणि मधुमेहावरील औषधांचा समावेश होता.
FDA च्या तपासणीत ‘आयबीयुप्लस’ आणि ‘कॅरेविटा-एम’ या औषधांमध्ये आवश्यक सक्रिय घटक आढळले नाहीत. त्यामुळे ही औषधे बनावट घोषित करण्यात आली. याशिवाय ‘कॅरेगिल-400’ या औषधाच्या तब्बल 13 लाख 86 हजार गोळ्यांचे उत्पादन कोणत्याही अधिकृत नोंदीशिवाय करण्यात आल्याचे उघड झाले.

दरम्यान, कंपनीच्या उत्पादन केंद्राची 14 आणि 15 जुलै रोजी तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी उत्तम उत्पादन पद्धतींशी संबंधित 25 गंभीर त्रुटी आढळल्या होत्या. तसेच कंपनीने आवश्यक परवानगीशिवाय 9 प्रकारच्या औषधांचे उत्पादन आणि विक्री केल्याचेही तपासात स्पष्ट झाले.
या प्रकरणी 29 ऑक्टोबर रोजी कंपनीला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. कंपनीचा खुलासा आणि 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीनंतर पुणे विभागाच्या सह आयुक्तांनी फॉर्म 25 आणि फॉर्म 28 अंतर्गत असलेले उत्पादन परवाने रद्द करण्याचे आदेश दिले.
विनापरवाना औषध उत्पादन केल्याप्रकरणी औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा 1940 अंतर्गत कंपनीविरुद्ध न्यायालयीन कारवाई प्रस्तावित आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या उत्पादकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.






