Loni kalbhor : “युवाशक्ती ही देशाला दिशा देणारी नवी ऊर्जा असते. युवा शक्तीला विधायक दिशेकडे घेऊन गेल्यास संपूर्ण गावाचा नव्हे तर देशाचा कायापालट होऊ शकतो याचा विश्वास महात्मा गांधी पासून सर्वच नेत्यांना होता. म्हणूनच त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना केली. गेली तीन वर्षे सातत्याने समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर सोरतापवाडी येथे आयोजित करत आहे. त्यामुळे या शिबिराचे निश्चितच सोरतापवाडी गावाचे स्मार्ट व्हिलेजकडे वाटचाल होण्यासाठी महत्वपूर्ण योगदान असणार आहे. असे मत सरपंच सरपंच सुनीता चौधरी यांनी केले आहे. (Loni kalbhor)

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर सोरतापवाडी येथे रविवारी (ता.21) पार पडले. या शिबिराच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना सरपंच सुनीता चौधरी यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी, लोणी काळभोरचे सरपंच नागेश काळभोर, प्राचार्य डॉ.अंबादास मंजुळकर, लोणी काळभोर विद्या संकुलाचे कार्याध्यक्ष राहुल काळभोर,सोरतापवाडीचे माजी उपसरपंच विकास चौधरी, सदस्य सनी चौधरी, कारभारी चौधरी, ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी विद्यालयाचा माजी विद्यार्थी शाहीर महेश खुळपे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करून विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची मने जिंकली. तर तरमदिहा सय्यद, यश लोंढे या दोन विद्यार्थ्यांनी शिबिरातील अनुभव सांगितले. भारतीय संविधान जागर, ‘व्यसनमुक्ती’, ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ आणि ‘डिजिटल साक्षरता,’हळदीकुंकू समारंभ, मनातल्या कविता या विषयांवर प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड, प्रा. डॉ. शेखर पाटील, प्रा. गणेश हजारे, प्रा. सुहासनाईक, प्रा. गणेश गाडेकर यांनी मार्गदर्शन केले.
या शिबिरात विद्यार्थ्यांनी गावातील रस्त्यांची व स्मशानभूमीची साफसफाई केली. कचरा कुंडीमुक्त गाव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. ठिकठिकाणी शोषखड्डे खोदून सांडपाण्याची विल्हेवाट लावली. या शिबिरासाठी प्रा. डॉ. संभाजी निकम यांचे बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहा हिंगमिरे यांनी केले तर आभार डॉ. शिवाजी गायकवाड यांनी मानले. Loni kalbhor






