Loni Kalbhor Big News : रस्ता अडवून रस्त्यावरच वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी कुप्रसिद्ध गुंड राज पवार सह 16 जणांवर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपी राज पवारला लोणी काळभोर पोलिसांनी आज रविवारी अटक केली आहे. अटक केल्यानंतर आरोपीला घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. परंतु, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी नाही तर धिंड काढली आहे. त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. असे गंभीर आरोप करून राज पवारच्या आई वडिलांनी अंगावर रॉकेल ओतून लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याचा धक्कादायक प्रकार आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. (Loni Kalbhor Big News)

राजचे वडील रविंद्र पवार व आई संगीता पवार हे लोणी काळभोर पोलिस ठाण्यात रविवारी आले होते. ते म्हणाले काहीही केले नसताना आमच्या मुलावर खोटे गुन्हे दाखल केले आहे. लोणी काळभोर पोलिसांनी आमच्यावर अन्याय केला आहे. तसेच राजची आज विनाकारण धिंड काढली आहे. माझ्या मुलाला आताच्या आता सोडा. आम्हाला न्याय द्या. अन्यथा आम्ही दोघेही जीवन संपवून टाकतो. असे म्हणून पोलिस ठाण्यात तब्बल अर्धा तास गोंधळ घातला.
मिळालेल्या माहितीनुसार, राज पवारचा गुरुवारी (ता.18) वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे अनेक मित्र कदमवाकवस्तीत आले होते. राज पवार बेकायदेशीर जमाव जमवून वाहतुकीचा रस्ता अडविला होता. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 16 जणांवर भारतीय न्याय संहीता कलम 126 (2),189(1), 189(2), 189 (4), भारतीय हत्यार कायदा कलम 4(25), महाराष्ट्र पोलीस अधि. 37(1) (2) (3) सह 135 क्रिमीनल अॅमॅटमेन्ट लॉ 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ 13 जणांना अटक केली आहे. प्रविण लक्ष्मण नाझीरकर (वय २१), ओम गणेश चव्हाण (वय २०), हर्षद नारायण चव्हाण (वय २१), आदित्य दादा गायकवाड (वय १९), अनिल मानसिंग होमणे (वय ३०), हर्षल शंकर जगताप (वय १९ ), अनिकेत महेश जांभळे (वय २३), सनि जयवंत भोसले (वय १९), सौरभ संतोष मस्के (वय १९), अभिषेक महेश जांभळे (वय २५ ), महेश संपत नाझीरकर (वय १९), कृष्णा सुरेश आरण (वय १९, सर्व रा. जेजुरी ता. पुरदंर जि. पुणे), सुदाम गुलाब चव्हाण (वय १९ रा. वासुली फाटा, म्हाळुंगे चाकण ता. खेड जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर राज रविंद्र पवार, नटराज शिवाजी कदम, प्रेम तानाजी गायकवाड (सर्व रा. गुजरवस्ती कवडीपाठ टोलनाका कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे) हे तिघेजण फरार झाले होते. फरार झालेल्या राज पवारला लोणी काळभोर पोलिसांनी आज रविवारी अटक केली होती.
दरम्यान, राज पवारला अटक केल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी लोणी काळभोर पोलीस राज पवारला घेऊन गेले होते. यावेळी लोणी काळभोर पोलिसांकडून धिंड काढली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याचाच राग मनात धरून राज पवारच्या आईवडिलांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या दोघांची समजूत काढण्यास पोलिसांच्या नाकीनऊ आले असून अजूनही राज पवारच्या आई वडिलांनी राज ला सोडल्याशिवाय पोलिस ठाण्यातून जाणार नाही. असा पवित्रा घेतला आहे. (Loni Kalbhor Big News)






