पुणे, ता. 13: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येणारे मार्केट यार्ड आणि सर्व उपबाजार गुरुवारी (ता. 15) बंद राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी बाजारात आणू नये, तसेच नागरिकांनी खरेदीसाठी येऊ नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप आणि सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी केले आहे.

दरम्यान, मार्केट यार्डातील मुख्य बाजारातील फळे, भाजीपाला, गुळ-भुसार, केळी, फुले व पान बाजार, पेट्रोल पंप तसेच वजनकाटा विभाग बंद राहणार आहेत. यासोबतच मोशी, पिंपरी, खडकी, मांजरी आणि उत्तमनगर येथील उपबाजारही पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले आहे.







