बारामती: ती सर्वोच्च न्यायालयात (Baramati News) वकिली करते. ती उच्चशिक्षित आहे. तिला आपल्या प्रश्नांची जाणीव आहे आणि ती ते प्रश्न ठामपणे मांडू शकते. असा समज जेव्हा प्रभावीपणे जनतेच्या मनात ठसतो, तेव्हा राजकारणात काय बदल घडू शकतो याचे जिवंत उदाहरण बारामतीत पाहायला मिळाले आहे. बारामतीकरांनी सर्वात तरुण नगरसेविकेला निवडून देत मोठा संदेश दिला आहे. तिचे नाव आहे संघमित्रा काळुराम चौधरी. तिच्या विजयानंतर हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली आणि ती मिरवणूक केवळ एका नगरसेविकेची नव्हे, तर जनतेच्या निर्णयाची होती. (Latest Marathi News)

बारामतीचे राजकारण नेहमीच वेगळे राहिले आहे. लोकसभेत प्रचंड मताधिक्य देणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या पक्षाला नगरपालिकेत मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. दुसरीकडे लोकसभेत पराभवाचा सामना करावा लागलेल्या अजित पवार यांना विधानसभेत भरभरून पाठिंबा मिळाला. त्याच आत्मविश्वासावर काही पक्षांनी नगरपालिकेतही सर्व जागा मिळतील असा अंदाज बांधला होता, मात्र मतदारांनी वेगळाच निर्णय दिला.
मतदारांना गृहीत धरून चालाल तर त्याचे परिणाम भोगावे लागतात, हाच स्पष्ट संदेश बारामतीकरांनी दिला आहे. विकास हवा आहे, नेतृत्व कोणाचेही चालेल, पण आमचा लोकप्रतिनिधी आम्हीच ठरवू, असे ठाम मत जनतेने व्यक्त केले. त्यामुळेच वेगवेगळ्या प्रभागांतून तब्बल सहा अपक्ष आणि वेगळ्या विचारांचे उमेदवार निवडून आले. त्यामध्ये बहुजन समाज पक्षाच्या संघमित्रा चौधरी यांचा विजय विशेष लक्षवेधी ठरला.
संघमित्राच्या विजयाने संविधानाचे महत्त्व, मतदानाचा अधिकार आणि प्रत्येक मताची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जातात, असा समज असलेल्या काळात एका सामान्य घरातील, चळवळीशी जोडलेल्या कुटुंबातून आलेल्या तरुणीने मिळवलेले यश अनेकांना विचार करायला लावणारे आहे. आज संघमित्राची हत्तीवरून मिरवणूक निघाली, तेव्हा अनेक बारामतीकरांनी ती आपल्या लेकीची मिरवणूक समजून रस्त्यावर उतरून तिचे स्वागत केले. हे चित्र बारामतीतील लोकशाहीची ताकद दाखवणारे ठरले आहे.,







