पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगतं पर्व, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्य अद्यापही धक्क्यात आहे. २८ जानेवारीच्या त्या दुर्दैवी विमान अपघाताने केवळ एका नेत्याला हिरावले नाही, तर अनेकांचा आधारस्तंभ कोसळला आहे. राजकारणात ‘दादां’ची ओळख एक शिस्तप्रिय नेता अशी होती, पण त्यांच्या निधनानंतर अनेक गोष्टी समोर येत आहेत.

अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे प्रशांत जगताप यांनी नुकतीच बारामतीतील अंत्यविधी स्थळाला भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर जगतापांनी शरद पवार यांची साथ धरली आणि नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राजकीय विचारसरणी वेगळी झाली, पक्ष बदलले, पण अजित पवारांशी असलेले रक्तापलीकडचे नाते मात्र तुटले नव्हते, हेच जगतापांच्या डोळ्यांतील अश्रूंनी अधोरेखित केले.
जगताप यांना ‘पॅरालिसिस’चा (अर्धांगवायू) झटका आला होता. राजकारणी म्हणून आपली कमकुवत बाजू जगासमोर येऊ नये, यासाठी त्यांनी १५ दिवस ही बाब लपवून ठेवली. पण जेव्हा ही गोष्ट फेसबुकच्या माध्यमातून समोर आली, तेव्हा रात्री ११:३० वाजता पहिला फोन आला तो अजित पवारांचा.
त्या रात्री अजितदादा केवळ नेते म्हणून नाही, तर एका मोठ्या भावाच्या अधिकाराने जगतापांवर ओरडले. “प्रशांत, हे तू माझ्यापासून का लपवलंस?” हा त्यांचा प्रश्न राजकीय नव्हता, तर ती काळजातून आलेली आर्त हाक होती. दुसऱ्या दिवशी सुरू असलेली महत्त्वाची बैठक बाजूला सारून दादांनी जगतापांच्या चेहऱ्यावरील मास्क काढायला लावला. त्यांच्या आजारपणाची तीव्रता पाहून दादांनी त्याच क्षणी आपल्या फॅमिली डॉक्टरला फोन लावला आणि स्पष्ट शब्दांत सांगितले, “हा माझ्या घरातला माणूस आहे, काहीही करा पण याला बरं करा.”








