लोणी काळभोर, ता. 9 : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीशी वाद झाल्यानंतर घरातून निघून गेलेले 55 वर्षीय जनार्दन विठ्ठल जगताप हे गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. कुटुंबीयांनी नातेवाईकांसह विविध ठिकाणी शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, अपहरणाच्या संशयावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जनार्दन जगताप हे कदमवाकवस्ती येथील कवडीपाट परिसरात कुटुंबासह राहत होते. ते हमालीचे काम करून उदरनिर्वाह करत होते. 15 जुलै 2026 रोजी सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी पत्नी वनमाला यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात त्यांनी लोणी काळभोर येथील मालधक्क्यावर राहत असल्याचे सांगून घर सोडले.

यापूर्वी जनार्दन यांनी लोणी काळभोरच्या मालधक्क्यावर हमालीचे काम केले होते. त्यामुळे कुटुंबीयांनी मालधक्क्यासह नातेवाईकांकडे आणि विविध गावांमध्ये त्यांचा शोध घेतला. मात्र, ते कुठेही आढळून आले नाहीत. यापूर्वीही ते रागाच्या भरात घरातून निघून जात आणि काही काळाने परत येत असत. त्यामुळे सुरुवातीला कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली नव्हती. मात्र, बराच काळ उलटूनही ते परत न आल्याने 12 ऑगस्ट रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली.

दरम्यान, बेपत्ता व्यक्तींच्या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्याबाबत वरिष्ठ पोलीस कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार पोलिसांनी या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. 8 ऑक्टोबर रोजी जनार्दन यांचा मुलगा किशोर जगताप यांचा जबाब नोंदविण्यात आला. त्यात अज्ञात व्यक्तीने वडिलांचे अपहरण केले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन महिने उलटूनही ठावठिकाणा नाही
जनार्दन जगताप हे घरातून निघून गेल्यापासून अद्याप परतलेले नाहीत. कुटुंबीयांकडून त्यांचा शोध सुरू असून, त्यांच्या बेपत्ता होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.






