शिरूर, ता. 17: माती विक्रीची तक्रार आली असून तुमच्या बाजूने पंचनामा करून देण्यासाठी शेतकऱ्याला 10 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती 7 हजार रुपये स्वीकारताना शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील ग्राम महसुल अधिकारी महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. एसीबीने ही कारवाई नाव्हरा तळेगाव रस्त्यावरील छत्रपती संभाजीराजे चौकाजवळ गुरुवारी (ता.16) केली आहे.

प्रमिला नागेश वानखेडे (वय 42, पद- ग्राम महसूल अधिकारी, नेम. शिरसगाव काटा (वर्ग 3), रा. फ्लॅट नंबर 404 तक्षशिला सोसायटी, ए विंग, पठारे ठुबे नगर, खराडी) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका 56 वर्षीय शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची शिरसगाव काटा येथे वडिलोपार्जित जमीन आहे. त्यांच्या वडीलांनी तोंडी वाटप करून भावंडाना जमीन दिली आहे. तक्रारदार हे त्यांच्या वाटणीस आलेल्या शेतीची लेवल करीत होते. तेव्हा त्यांच्या भावाने सदरची लेवल थांबवून वाटणीप्रमाणे रेकॉर्ड झाल्यावर तू लेवल कर व तुझा ऊसही नंतर तोडणी कर असे सांगितले होते. त्यावरून तक्रारदार यांनी सदरचे काम थांबवले होते.
दरम्यान, शिरसगाव काटा गावच्या तलाठी प्रमिला वानखेडे या 9 जानेवारीला तक्रारदार यांच्या शेतातील राहत्या घरी आल्या. आणि म्हणाल्या तुमच्या शेताचा पंचनामा करायचा आहे. तुम्ही माती विकत असल्याबाबत तक्रार आली आहे. तुम्ही तलाठी कार्यालयात येऊन भेटा असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे 12 जानेवारीला आरोपी लोकसेविका वानखेडे यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. तेव्हा वानखेडे यांनी तक्रारदार यांना सांगितले की, तुम्ही 10 हजार रुपये द्या. तुमच्या बाजूने पंचनामा करते असे म्हणून तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, आरोपी लोकसेविका प्रतिभा नागेश वानखेडे यांनी तक्रारदारांच्या बाजूने शेतीचा पंचनामा करण्याकरता व इथून पुढे सहकार्य करण्याकरीता तडजोडीअंती 7 हजार रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छत्रपती संभाजीराजे चौकाजवळ गुरुवारी (ता.16) सापळा रचला. तेव्हा लोकसेविका प्रतिभा वानखेडे यांना तक्रारदार यांच्याकडून 7 हजार रुपयांची लाच स्वीकारतानारंगेहाथ पकडण्यात आले आहे.
आरोपी लोकसेविका प्रतिभा वानखेडे यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप-अधीक्षक भारती मोरे करत आहेत.







