Pune Crime: पुणे : किरकोळ वाद आणि एकतर्फी प्रेमातून घडलेल्या दोन वेगवेगळ्या खुनांच्या घटनांचा पोलिसांनी यशस्वी उलगडा केला असून या प्रकरणात चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या तपासादरम्यान एका आरोपीने यापूर्वीही अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे किरकोळ कारणावरून खून केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे हा आरोपी सीरियल किलर वृत्तीचा असण्याची शक्यता पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा- LONI KALBHOR NEWS: लोणी स्टेशन येथील सेंट टेरेसा स्कूल जवळ सापडला वृद्ध व्यक्तीचा मृतदेह
सासवड आणि जेजुरी परिसरात या दोन हत्या झाल्या होत्या. सासवड शहरात 9 डिसेंबर रोजी किरकोळ वादातून राजू दत्तात्रेय बोराडे (वय 38, रा. म्हाडा कॉलनी, सासवड) यांचा खून करण्यात आला होता. एका बांधकाम साइटवर त्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या घटनेनंतर सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि सासवड पोलिस ठाण्याच्या पथकांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीचा आधार घेतला. त्यानुसार सूरजप्रकाश बलराम निषाद (वय 34, मूळ छत्तीसगड) आणि नीरज ओमप्रकाश गोस्वामी (वय 25, मूळ मध्य प्रदेश) या बांधकाम मजुरांना अटक करण्यात आली. चौकशीत दारू पित असताना झालेल्या किरकोळ वादातून बोराडे यांचा धारदार हत्याराने खून केल्याची कबुली आरोपींनी दिली.
तपास अधिक पुढे नेत असताना नीरज गोस्वामी याच्याविरोधात यापूर्वी जामखेड (जिल्हा अहिल्यानगर) येथे खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांकडून या आरोपीचा गुन्हेगारी इतिहास तपासला जात आहे. दरम्यान, या दोन्ही आरोपींना 19 डिसेंबर 2025 पर्यंत पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.







