पुणे : पुण्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. नुकतीच एक घटना समोर आली असून, पोलिसही थक्क झाले आहेत. चोरटयांनी पोलिसांची दिशा भूल करण्यासाठी चक्क महिलांचे कपडे परिधान करून चोरी केल्याचं समोर आलं आहे. या चोरटयांनी तब्बल दोन लाखांची चोरी केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

पुण्यातील रामटेकव़डी परिसरात ही घटना घडली. याठिकाणी असलेल्या औद्योगिक वसाहतीतील हरको ट्रान्सफॉर्मर कंपनीत 26 ऑगस्ट रोजी मध्यरात्री चोरीची घडली. या चोरटयांनी महिलांचे गाऊन परिधान करून ही चोरी केली. चोरटयांनी आधी खिडक्यांचे लोखंडी गज तोडत कंपनीत प्रवेश केला आणि तांब्याच्या तारांचे बंडल चोरले. एवढेच नाही तर खिडक्यांचे लोखंडी गज देखील आपल्या सोबत नेले.
या घटनेची माहिती कंपनी मालकाला समजताच त्याने पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला आणि दोन्ही चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणात अटक केलेल्या चोरट्यांनी नावं अमन अजीम शेख (वय 24), मुसा अबू शेख (वय 24) अशी आहेत.
आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लाख 19 हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा आणि पट्ट्या जप्त केल्या आहेत. तसेच पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







