Pune Crime: सासवड, ता. 19 : गुऱ्होळी (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल महाराजासमोर झालेल्या गोळीबार व प्राणघातक हल्ल्यातील एका आरोपीला सासवड पोलीसांच्या पथकाने अवघ्या 24 तासात ताब्यात घेतले आहे. तर या गुन्ह्यातील आणखी आठ आरोपी फरार असून ग्रामीण पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

अथर्व श्रीकांत जगताप (वय -19, रा. सुपे खुर्द) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर विनित कुंजीर, स्वराज खेडेकर, दीपक खेडेकर, भावेश कुंजीर, सोहम गोरड, शुभम कुंभारकर, कुंकेश भिसे आणि राहुल खेडेकर अशी फरार आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी सध्या फरार असून, त्यांच्या शोधासाठी तीन पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. 16) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कृष्णा बाबासाहेब हवालदार (रा. उरुळी कांचन) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या 6 ते 7 जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके व कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यादरम्यान एका आरोपीने गावठी पिस्तुलातून हवेत तसेच फिर्यादीच्या दिशेने गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तपास घेत असताना सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम व स्थानिक गुन्हे शाखेचे अविनाश शिळीमकर यांनी चार विशेष पथकांची नेमणूक केली होती. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्यातील 9 आरोपींची ओळख पटवली.
दरम्यान, अथर्व जगताप याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. जगताप याला न्यायालयात हजार केले असता त्याला गुरुवार (ता. 22) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे करत आहेत.







