पुणे: भोसरीतील महात्मा फुलेनगर परिसरात अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या वादाने गंभीर वळण घेतल्याची घटना समोर आली आहे. आईवर जादूटोणा केल्याच्या संशयातून दोन तरुणांनी एका महिलेला आणि तिच्या मुलाला मारहाण करत तलवारीने धमकावल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना 1 एप्रिल रोजी रात्री सुमारे 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी 34 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या मुलीला आणण्यासाठी नातेवाईकांच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी एका नातलग महिलेने “तुझ्या नवऱ्याने माझ्यावर करणी केली आहे” असा आरोप करत वाद सुरू केला. हा वाद चिघळत गेल्यानंतर आरोपींनी फिर्यादी महिला आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ करत मारहाण केली.
या दरम्यान एका अल्पवयीन आरोपीने घरातून तलवार आणत फिर्यादीच्या मुलावर उगारली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.
सुदैवाने या घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झाली नसली तरी, अंधश्रद्धेमुळे अशा प्रकारचे हिंसक प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या एमआयडीसी भोसरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






