Pune Traffic: पुणे: नववर्ष (New Year) सुरू होण्यासाठी आता काही तासच शिल्लक राहिले असून पुणे (Pune city) शहरात नववर्ष स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही 31 डिसेंबर रोजी शहरातील प्रमुख भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी लक्षात घेऊन पुणे वाहतूक पोलिसांनी काही रस्त्यांवर वाहतुकीत बदल तसेच काही ठिकाणी ठराविक वेळेसाठी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा- भाजपचं टेन्शन वाढलं! पुण्यात राष्ट्रवादीची ‘एकी’ साध्य; एकाच प्रभागात घड्याळ अन् तुतारी एकत्र लढणार
लष्कर आणि डेक्कन जिमखाना परिसरात 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यानंतर महात्मा गांधी रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्त्यावर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. हे बदल मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहेत. लष्कर भागात वाय जंक्शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे जाणारी वाहतूक 15 ऑगस्ट चौकात बंद ठेवली जाणार आहे. ही वाहतूक कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौक मार्गे वळवली जाणार आहे. इस्कॉन मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याकडे तसेच अरोरा टॉवर्सकडे जाणारी वाहतूक बंद राहणार आहे. व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूकही थांबवली जाणार आहे. या परिसरातील वाहने ईस्ट स्ट्रीटमार्गे इंदिरा गांधी चौकाकडे वळवली जातील.
इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून वाहनचालकांना लष्कर पोलीस ठाण्याच्या दिशेने वळवले जाईल. सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूकही बंद राहणार आहे.
फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरही बदल करण्यात आले आहेत. कोथरूड आणि कर्वे रस्त्याकडून शहरात येणारी वाहतूक खंडुजीबाबा चौकात थांबवली जाईल. येथून वाहनांना विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता आणि अलका चौक मार्गे पाठवण्यात येईल. जंगली महाराज रस्त्यावर होणाऱ्या गर्दीमुळे झाशीची राणी चौकातून पुढील वाहतूक बंद ठेवली जाईल. त्यामुळे वाहनचालकांनी गोखले स्मारक चौक, उपरस्ते, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचा पर्यायी मार्ग वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावर 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यानंतर वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. 15 ऑगस्ट चौक ते अरोरा टॉवर्स चौक दरम्यान रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. तसेच फर्ग्युसन रस्त्यावर गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत वाहतूक बंद राहणार असून ही वाहतूकबंदी 1 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.







