पुणे: पुणे महापालिका निवडणुकीचा (Pune Politics) प्रचार संपल्यानंतर अवघ्या काही तासांतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा (Naresh Arora) यांच्याशी संबंधित ‘डिझाइनबॉक्स्ड’ या संस्थेच्या कार्यालयात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू (Ajit Pawar) झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. (Latest Marathi News)

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी पुण्यातील ‘डिझाइनबॉक्स्ड’च्या कार्यालयात भेट देत काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. या पाहणीदरम्यान आवश्यक कागदपत्रे आणि माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र प्रचार थांबताच अजित पवार यांच्या निकटवर्तीय सल्लागाराच्या कार्यालयात पोलिस पोहोचल्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापले.
सध्या पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांनी अलीकडेच भाजपवर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला होता. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजकीय आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले होते. त्यानंतर लगेचच गुन्हे शाखेचे अधिकारी त्यांच्या सल्लागाराच्या कार्यालयात दाखल झाल्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले.
नरेश अरोरा हे अजित पवार यांचे प्रमुख राजकीय सल्लागार म्हणून ओळखले जातात. ‘डिझाइनबॉक्स्ड’ ही संस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार मोहिमेचे नियोजन, सभा आयोजन, जनसंपर्क आणि राजकीय रणनीती आखण्याचे काम पाहते. लोकसभा निवडणुकीपासून ते महापालिका निवडणुकीपर्यंत ही संस्था अजित पवार यांच्या राजकीय मोहिमेत सक्रिय आहे.

या संपूर्ण प्रकारावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत स्पष्ट केले की, गुन्हे शाखेचे अधिकारी केवळ माहिती घेण्यासाठी कार्यालयात आले होते. त्यांनी सांगितले की, “नरेश अरोरा आणि ‘डिझाइनबॉक्स्ड’च्या पुणे कार्यालयात क्राईम ब्रँचचे अधिकारी माहिती घेण्याच्या उद्देशाने आले होते. आवश्यक ती सर्व माहिती देण्यात आली असून पूर्ण सहकार्य करण्यात आले आहे. या प्रक्रियेत कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा अनियमितता आढळलेली नाही.”
निवडणुकीच्या काळात प्रशासनाच्या प्रत्येक हालचालीकडे राजकीय नजरेतून पाहिले जाते. त्यामुळे या भेटीला राजकीय रंग दिला जात असला तरी अजित पवार यांच्या स्पष्टीकरणानंतर या प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता आहे. मात्र मतदानाच्या उंबरठ्यावर झालेली ही घडामोड पुण्यातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.







