Pune News : पुणे : पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली असून, अलीकडे प्रसिद्ध झालेल्या टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्स (TomTom Traffic Index) अहवालात जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांच्या यादीत पुण्याचा 5 वा क्रमांक लागला आहे. यामुळे प्रशासनाने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषत: पुणे रिंग रोड प्रकल्प आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पूर्व भागातील काम 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, तर पश्चिम भागाचे काम 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पूर्व भागात एकूण 12 पॅकेजेस असून त्यापैकी 9 पॅकेजेसवर सध्या प्रत्यक्ष काम सुरू आहे. उर्वरित 3 पॅकेजेस प्रशासकीय मंजुरीच्या टप्प्यात आहेत. या पॅकेजेसची निविदा प्रक्रिया मेपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता असून त्यानंतर ऑक्टोबरपासून बांधकाम सुरू होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत हडपसर ते यवत दरम्यान उन्नत मार्ग उभारला जाणार आहे. या मार्गामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच या उन्नत मार्गावरून मेट्रो सेवा सुरू करण्याचेही नियोजन आहे. त्यामुळे दुहेरी उड्डाणपूल उभारण्याची योजना तयार करण्यात आली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) मार्फत पूर्ण केला जाणार आहे.
दरम्यान, या कामामुळे गाडीतळ परिसर आणि नोबेल हॉस्पिटलजवळील काही विद्यमान उड्डाणपुलांमध्ये बदल करण्याची गरज भासू शकते. काही ठिकाणी पुनर्बांधकाम किंवा फेरबदल करण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. या सर्व प्रकल्पांमुळे भविष्यात पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.







