पुणे: पुणे महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधील वाद चव्हाट्यावर आला असून युतीमध्ये मोठी फूट पडल्याचे दिसत आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांतील संवाद थांबला असून रवींद्र धंगेकर आणि भाजप नेत्यांमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. धंगेकर यांच्या प्रभागात जागा सोडण्यास भाजपने नकार दिल्याने शहरात युतीचा मोठा खेळखंडोबा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग 23 आणि 24 मध्ये आपल्या कुटुंबासाठी जागा मागणाऱ्या धंगेकरांची भाजपने पूर्णपणे कोंडी केली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी धंगेकर यांनी अजित पवार यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तिथेही त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. यामुळे संतापलेल्या शिवसेना नेत्यांनी आज पुण्यात युती तुटल्याचे संकेत देत चक्क 165 जागांवर उमेदवारी अर्जांचे वाटप केले.
दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात धाव घेत युती टिकवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असला, तरी स्थानिक पातळीवर तणाव कायम आहे. भाजपच्या वागणुकीमुळे धंगेकर हे स्वबळावर लढण्यासाठी आग्रही असून सन्मान मिळत नसेल तर लाचारी पत्करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, हा तिढा कसा सुटेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







