पुणे: पुणे (Pune News) शहराच्या विकासावर गेल्या 9 वर्षांत जो प्रचंड पैसा खर्च झाल्याचा दावा भाजप करत आहेत, त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भवानीपेठेत पार पडलेल्या सभेमध्ये बोलताना त्यांनी थेट 75000 कोटी रुपयांच्या हिशोबावर शंका व्यक्त केली. इतका मोठा निधी वापरूनही शहरात नेमकी कोणती ठोस कामे झाली, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

पुण्याची सत्ता ज्यांच्या हातात होती, भाजपला शहराचा विकास साधता आला नाही आणि म्हणूनच नागरी सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाला असल्याची टीका त्यांनी केली. जागतिक स्तरावर 500 शहरांचा जो अभ्यास झाला, त्यात पुण्याचा वाहतूक कोंडीत जगात ४ था क्रमांक लागला, ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी असून हे सत्ताधाऱ्यांचे अपयश असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुण्यातील रस्ते, पाण्याची टंचाई आणि प्रदूषण या समस्यांनी नागरिक त्रस्त असतानाच महापालिकेतील सफाई कामात मोठा घोटाळा असल्याचे त्यांनी उघड केले. कागदावर 12350 सफाई कर्मचारी असल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात त्यातील अनेक जण कामावरच नसल्याचे त्यांनी पुराव्यासह सांगितले.
बोगस नावांनी कोट्यवधी रुपये लुटले जात असून हे प्रकार थांबवण्यासाठी शहरात राजकीय बदल घडवणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी केले. 75000 कोटी रुपये नेमके कोणाच्या खिशात गेले, असा खोचक प्रश्न विचारत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत. पुण्याच्या हितासाठी आता नवीन विचारांची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.







