Pune News : पुणे : पुण्यासह राज्यात गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर काही उपाहारगृहांकडून ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने स्पष्ट सूचना जारी केल्या आहेत. ग्राहकांकडून ‘गॅस अधिभार’ किंवा इतर कोणत्याही नावाखाली जादा पैसे घेण्यास मनाई करण्यात आली आहे.

अलीकडील काळात आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेवर काही प्रमाणात मर्यादा आल्या आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत काही उपाहारगृहांनी ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले. काही ठिकाणी या शुल्काचा उल्लेख थेट बिलामध्येही करण्यात आला असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी प्राधिकरणाने कडक भूमिका घेतली आहे. उपाहारगृहांनी गॅस टंचाईचे कारण देत कोणत्याही प्रकारे अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मेन्यू कार्डमध्ये अशा प्रकारचा उल्लेख करणेही चुकीचे मानले जाणार आहे.
प्राधिकरणाच्या सूचनांनुसार, उपाहारगृहांनी आपल्या खर्चाचे व्यवस्थापन स्वतः करावे आणि त्याचा भार ग्राहकांवर टाकू नये. बिलिंग प्रक्रियेत पारदर्शकता राखणे आवश्यक असून, ग्राहकांना आकारण्यात येणाऱ्या किमती आधीच स्पष्टपणे मेन्यूमध्ये दाखविलेल्या असाव्यात. कोणत्याही प्रकारचे लपविलेले शुल्क टाळावे, असेही सांगण्यात आले आहे.
तज्ज्ञांच्या मते, गॅस टंचाईच्या नावाखाली जादा पैसे घेणे ही अनुचित व्यापार पद्धती ठरू शकते. त्यामुळे अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी घेतलेले हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.







