pune election : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत रविवार पेठ–नाना पेठ (प्रभाग क्र. 23) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. अनेक दशकांपासून या भागात आपलं राजकीय बळ टिकवून ठेवणाऱ्या आंदेकर कुटुंबातील प्रमुख सदस्य सध्या तुरुंगात असल्याने या भागात नव्या राजकीय समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रभाग क्र. 23 मध्ये कोण बाजी मारणार ?
प्रभाग 23 मध्ये आंदेकर कुटुंबाचं वर्चस्व दीर्घकाळ टिकून होतं. मात्र, आयुष कोमकर आणि गणेश काळे हत्येप्रकरणानंतर कुटुंबातील प्रमुख सदस्यांना अटक झाल्याने स्थानिक राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या परिस्थिती मुळे, उमेदवारीवर अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं असून, विविध पक्ष या इथे संधी साधण्याचा प्रयत्न करताना दिसताय. सोबतच आता अनेक पक्षांकडून नवे पर्याय समोर येत आहेत.
पूर्वी आंदेकर कुटुंब काँग्रेसशी जोडलेलं होतं. वत्सला आंदेकर यांनी पुण्याच्या महापौरपदाची धुरा सांभाळली होती. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातूनही या कुटुंबाने आपला प्रभाव कायम ठेवला. मात्र आता, या कुटुंबातील कोणालाही निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार नसल्याच्या चर्चा आहेत.
भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात
या पार्श्वभूमीवर भाजप याच संधीचं सोनं करण्याची तयारी करताना दिसत आहे. या प्रभागात भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरू केली जात आहे. तर शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेले विशाल धनवडे हे पक्षाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी चांगली कामगिरी केली होती आणि स्थानिक प्रश्नांवर त्यांची चांगली पकड असल्याने पक्ष नेतृत्व त्यांच्यावर विश्वास दाखवू शकतं. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
‘हे’ नेते लागले तयारीला
अनुसूचित जाती प्रवर्गातून सामाजिक कार्यकर्ते सुधीर जानजोत यांचं नाव चर्चेत आहे. दलित समाजात त्यांचा मजबूत प्रभाव असून ते सक्रियपणे जनसंपर्क करत आहेत.
तर सर्वसाधारण गटातून वीरेंद्र किराड, संजय मोरे आणि चेतन मोरे ही नावे आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडूनही या प्रभागात तयारी सुरू आहे. शहरप्रमुख संजय मोरे हे स्वतः उमेदवारीसाठी तयार असल्याचं कळतं, तर चेतन मोरे यांनी देखील संघटन मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
आंदेकर कुटुंबाच्या गैरहजेरीचा घेतला जाणार फायदा
आंदेकर कुटुंबाच्या गैरहजेरीत निर्माण झालेल्या या पोकळीचा फायदा भाजप घेईल का, आणि या प्रभागात कोणतं नवं राजकीय समीकरण तयार होईल, याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे..







