Pune Cyber Crime : पुणे : पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया आणि ऑनलाइन आर्थिक व्यवहार वाढल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात सायबर गुन्ह्यांचे लक्ष्य बनत आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्यात येत असून त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांचा विचार करता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत 2024 साली स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याला मंजुरी देण्यात आली. आयुक्तालयांतर्गत सध्या एकूण 25 पोलीस ठाणे कार्यरत आहेत. सायबर फसवणुकीशी संबंधित तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल केल्या जातात आणि त्यानंतर सायबर पोलीस ठाण्यामार्फत गुन्ह्यांचा सखोल तपास केला जातो.
गेल्या एक वर्षाच्या कालावधीत पोलिसांनी सायबर फसवणुकीच्या अनेक प्रकरणांचा तपास करून ठोस कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 112 गुन्हे उघडकीस आले असून 215 संशयितांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचून फसवणुकीची रक्कम जप्त केली आहे.
या कारवाईमुळे सायबर फसवणुकीला बळी पडलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी पीडित नागरिकांना एकूण 24 कोटी 38 लाख 52 हजार 842 रुपये परत मिळवून दिले आहेत. ही रक्कम विविध ऑनलाइन फसवणूक प्रकरणांमधून वसूल करण्यात आली आहे.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनोळखी कॉल, संदेश, लिंक किंवा आमिषाला बळी न पडता तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांच्या या प्रयत्नांमुळे सायबर गुन्हेगारांचे मनोबल खच्ची झाले असून भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यास मदत होणार आहे.






