Pune Cyber Crime : पुणे : सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून आता सरकारी यंत्रणेतील व्यक्तीदेखील यापासून सुरक्षित राहिलेल्या नाहीत. ‘फ्री टीव्ही चॅनेल’ पाहण्याच्या आमिषाला बळी पडून पुण्यातील एका 44 वर्षीय पोलीस हवालदाराची 71000 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे सायबर गुन्हेगारांच्या नव्या पद्धतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंढवा परिसरात राहणारे संबंधित हवालदार 11 डिसेंबर रोजी आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना त्यांच्या इन्स्टाग्रामवर “अँड्रॉइड टीव्हीवर सर्व चॅनेल्स फ्री पाहा” अशी जाहिरात दिसली. उत्सुकतेपोटी त्यांनी त्या लिंकवर क्लिक केले. लिंक उघडताच त्यांचा मोबाईल अचानक हँग झाला. त्यांनी फोन बंद करून पुन्हा सुरू केला, त्यानंतर सर्व काही सुरळीत असल्याचे दिसले.
मात्र दुसऱ्या दिवशी 12 डिसेंबर रोजी ते खरेदीसाठी डी-मार्टमध्ये गेले असताना त्यांना धक्का बसला. बिल भरण्यासाठी गुगल पे उघडल्यावर त्यांच्या खात्यातून 41000 आणि 30000 असे एकूण 71000 रुपये वजा झाल्याचे दिसून आले. ही रक्कम यशराज बैरागी नावाच्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले.
या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सायबर कक्षाच्या तपासात संबंधित व्यवहार मध्य प्रदेशातील शाजापूर येथील खात्यावर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयराज डोके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना अज्ञात लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावरील आकर्षक जाहिरातींच्या आहारी न जाता सतर्क राहणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले आहे.







