अमित मुंडीक

पुणे: दि. ०५/०१/२०२६ रोजी येरवडा (Pune Crime) पोलीस स्टेशन हद्दीतील नगर–पुणे रोड, कल्याणीनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये दिवसाढवळ्या घरफोडीचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी येरवडा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३३३ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना दिवसा घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. (Latest Marathi News)

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तपास पथक तात्काळ रवाना करण्यात आले. घटनास्थळी पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता तीन इसम मास्क व हेल्मेट घालून फिर्यादी यांच्या घरात प्रवेश करताना व काही वेळाने बाहेर पडताना दिसून आले. गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये यश मोहन कु-हाडे (वय २०), रुषभ प्रदीप सिंग (वय २१) आणि प्राज विवेक भैरामडगीकर (वय १८) यांचा समावेश आहे. चौकशीत फ्लॅटचे थकलेले भाडे भरण्यासाठी हा गुन्हा केल्याची कबुली त्यांनी दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे करत आहेत.







