Pune Crime : पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर फरार झालेला संशयित तरुण नंतर टेकडीवर गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

मृत तरुणाचे नाव महेश डामसे असे आहे. त्याचे त्याच गावातील एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. काही दिवसांपूर्वी त्याने त्या तरुणीकडे लग्नासाठी विचारणा केली होती. मात्र तरुणीने त्याच्या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला होता. या नकारामुळे महेश नाराज झाला होता आणि त्याच्या मनात राग निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
बुधवारी सकाळी संबंधित तरुणी जुन्नर येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वस्तीगृहातून महाविद्यालयाकडे जाण्यासाठी बाहेर पडली होती. त्यावेळी वस्तीगृहाजवळ थांबलेल्या महेशने तिला अडवले. काही समजण्याच्या आत त्याने जवळ असलेल्या कोयत्याने तिच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडली.
घटनेनंतर आरोपी महेश घटनास्थळावरून फरार झाला होता. माहिती मिळताच जुन्नर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, पुढील दिवशी सकाळी परिसरातील एका टेकडीवर महेशची दुचाकी आढळून आली. त्यानंतर परिसरात शोध घेतला असता जवळील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला.
हल्ल्यानंतर अटकेच्या भीतीमुळे किंवा पश्चातापातून महेशने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. जखमी तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.






