Pune Crime: पुणे : पुण्यातील खडकवासला परिसरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. रात्री मित्रांसोबत पार्टी आणि मस्करी सुरू असताना एका २५ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. संतापलेल्या मित्राने थेट गोळी झाडून तरुणाला जीवे मारले आहे. सकाळी पुलाखाली मृतदेह (Deathbody) आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. विशाल संजय चव्हाण, रा. कोल्हेवाडी, किरकटवाडी असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे खडकवासला आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (Pune Murder Case)

मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री खडकवासला परिसरातील कोल्हेवाडी येथे विशाल आपल्या ४ ते ५ मित्रांसोबत पार्टीसाठी गेला होता. सर्व मित्र एकत्र बसून मद्यपान करत असताना सुरुवातीला हसतखेळत गप्पा सुरू होत्या. मात्र काही वेळानंतर एकमेकांची चेष्टा मस्करी करताना अचानक वादाला सुरुवात झाली. मद्यधुंद अवस्थेमुळे हा वाद अधिक वाढत गेला. पाहता पाहता हा वाद इतका गंभीर झाला की, एका मित्राने रागाच्या भरात पिस्तूल काढून विशालच्या डोक्यात गोळी झाडली. गोळी लागल्याने विशालचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळावरून मित्र फरार
घटना घडल्यानंतर आरोपी घाबरले. मित्राचा मृत्यू झाल्याचे पाहून त्यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. विशालचा मृतदेह डोणजे, ता. हवेली येथील पानशेत रस्त्यावरील एका पुलाखाली नेऊन फेकून देण्यात आला. त्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. बुधवारी सकाळी पुलाखाली मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
हवेली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा सखोल तपास सुरू आहे. संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपी लवकरच ताब्यात घेतले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.





