पुणे: पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण आणि खेड परिसरातील (Nashik Phata–Khed Elevated Corridor) सततच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महत्त्वाचा ठरणारा ‘नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर’ प्रकल्प आता प्रत्यक्ष मार्गावर येण्याच्या टप्प्यात आहे. सुमारे 7,827 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची तांत्रिक निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, Adani Enterprises सह तीन मोठ्या कंपन्यांनी यात रस दाखवला आहे. त्यामुळे लवकरच काम सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

NHAI मार्फत राबवण्यात येणारा हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक असणार आहे. सुमारे 30 किलोमीटर लांबीचा हा 8 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर सिंगल पिलरवर उभारला जाणार असून, त्यामुळे जमिनीवरील जागेचा वापर कमी होईल. यासोबतच खालील विद्यमान महामार्गाचे 4 ते 6 पदरी रुंदीकरण करण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिक आणि लांब पल्ल्याची वाहतूक वेगळी होणार असून, भोसरी, मोशी, चाकण आणि खेड या औद्योगिक भागांमध्ये प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होईल. सध्या या मार्गावर दररोज हजारो वाहनांची गर्दी होत असल्याने कामगार आणि उद्योगांना मोठा फटका बसतो. हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर चाकण एमआयडीसीकडे जाणाऱ्या लाखो कामगारांचा तासन्तास होणारा खोळंबा मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पासाठी स्थानिक पातळीवर पाठपुरावा करणारे आमदार महेश लांडगे यांनी भू-संपादनाच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. केंद्रातील पायाभूत सुविधा धोरणांअंतर्गत हा प्रकल्प पुढे नेला जात असून, नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात तो वेगाने मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
एकूणच, हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड आणि चाकण परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होण्याची शक्यता असून, औद्योगिक विकासालाही यामुळे चालना मिळणार आहे.







