पुणे: पुण्यातील गुन्हेगारी विश्वातून एक बातमी समोर आली आहे. सुरुवातीला पुण्यातील घायवळ टोळीचा खास सदस्य असलेल्या एका गुंडावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष धुमाळ (MCOCA On Santosh Dhumal) असं या गुंडाचं नाव आहे. एका तरुणाकडून 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात संतोष आनंद धुमाळ, सागर गवासने आणि विपुल उत्तम माझिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार धुमाळ टोळीसोबत कार्यरत…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी रोहित आखाडे याने पोलिसांत तक्रार दिली आहे. 10 लाखांची खंडणी मागितल्याची घटना 4 सप्टेंबर रोजी पुण्यातील कोथरूड येथील शास्त्रीनगर परिसरात घडली. ताक्रदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, आखाडे हा 2021 मध्ये धुमाळच्या गँगसोबत कार्यरत होता. एका गुन्ह्यात त्याला अटक झाली. त्यानंतर पोलिसांना रोहित आखाडे याने धुमाळविषयी माहिती दिली होती.
तुझ्यामुळे मला अटक झाली, म्हणून मला 10 लाख रुपये दे, नाहीतर
दरम्यान, तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास, धुमाळने आखाडेला व्हिडिओ कॉल केला होता. तेंव्हा तो म्हणाला “तु कुठे आहेस, मला भेटायला ये, तुझ्यामुळे मला अटक झाली आहे, म्हणून मला 10 लाख रुपये दे, नाहीतर तूझ्यावर गोळीबार करेल,” अशी जीवे मारण्याची धमकी दिली.
मात्र, आखाडे याने यावेळी तक्रार नोंदवली नव्हती. त्यानंतर 4 सप्टेंबरला धुमाळने आखाडे याला पुन्हा फोन करून खंडणी मागितली. त्यानंतर धुमाळ आणि त्याचे साथीदार कोथरूड परिसरात आले. तेथे त्यांनी दहशत माजवली व निघून गेले. या प्रकारानंतर यानंतर रोहित आखाडेने पोलिसांत फिर्याद दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष धुमाळ हा पूर्वी निलेश घायवळच्या टोळीचा खास सदस्य होता. परंतु, त्यांच्यात काही कारणास्तव वाद झाला. त्यानंतर गुंड धुमाळने घायवळ टोळी सोडली होती.
या प्रकरणी आता धुमाळवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला असून पुढील कारवाई केली जाणार आहे.







