पुणे: भाजपचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील वाद पुन्हा एकदा चांगलाच चिघळताना दिसत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या (Pimpri-Chinchwad Election) पार्श्वभूमीवर दोघांमधील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत. अजित पवार हे महाराष्ट्राचे आका आहेत, अशी जहरी टीका महेश लांडगेंनी केली होती. त्यावर अजित पवारांनी चार शब्दांत विषय संपवला होता. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा लांडगेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

एकेरी भाषेत आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्यावर भाष्य केल्यानंतर संध्याकाळी संबंधित व्यक्ती भाजपमध्ये दाखल झाल्याचा उल्लेख करत महेश लांडगेंनी थेट अजित पवारांवर टीका केली. देवा भाऊंनी इशारा दिल्यावर आपले घोटाळे काढणारे सुद्धा जमा होतात, असे म्हणत लांडगेंनी अजित पवारांवर एकेरी भाषेत आरोप केले.
आमच्या नादी लागू नको
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी महेश लांडगेंचा भ्रष्टाचाराचा आका असा उल्लेख केला होता. यावर संतप्त झालेल्या लांडगेंनी तू आमचा कार्यक्रम करणार म्हणतोस, मग आम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का, असा सवाल केला. आमच्या नादी लागू नको, आमच्या लाडक्या बहिणी तुझा कार्यक्रम करतील, असा इशाराही त्यांनी दिला.

अजित पवार हे महाराष्ट्राचे आका
महेश लांडगे यांनी पुन्हा एकदा अजित पवार हे महाराष्ट्राचे आका असल्याची टीका केली. स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी तुम्ही भाजपमध्ये आला आहात, आधी स्वतःच्या मुलाचे पराक्रम पाहा, असेही त्यांनी म्हटले. जे स्वतःच्या काकांचे होऊ शकले नाहीत, ते पिंपरी-चिंचवडचे काय होणार, असा सवालही लांडगेंनी उपस्थित केला.
अजित पवारांचं उत्तर
दरम्यान, या टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, मी कोण आहे हे जनता ठरवेल. 15 तारखेपर्यंत वेळ काढा, उत्तर देतो. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील खड्डे, कचरा, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई आणि गुन्हेगारी हे खरे अलार्म आहेत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. पालिकेत मोजक्याच लोकांना टेंडर दिले जात असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.







