Loni Kalbhor News: लोणी काळभोर, ता. 23 : मुळा-मुठा नदीपात्रालगत वाढत चाललेल्या कचऱ्याच्या समस्येने गंभीर रूप धारण केल्यानंतर अखेर लोणी काळभोर ग्रामसभेत कठोर आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 113 मधील 18 एकर जागेची शासकीय मोजणी करून नदीपात्र वगळता उर्वरित क्षेत्रावर अत्याधुनिक कचरा वर्गीकरण प्रकल्प, नदी सुधार प्रकल्प, गार्डन आणि ओपन जिम उभारण्याचा ठराव विशेष ग्रामसभेत आज सोमवारी (ता. 23) सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या शीतल कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुर्यकांत गवळी, माजी चेअरमन विठ्ठल काळभोर, शिवसेनेचे रमेश भोसले, संतोष भोसले, पोलीस पाटील लक्ष्मण काळभोर, सिध्देश्वर काळभोर आदींनी वरील ठरावाला मंजुरी दिली. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामसभेत केवळ कचरा प्रश्नावरच नव्हे, तर अतिक्रमणाच्या मुद्द्यावरही कठोर भूमिका घेण्यात आली. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी प्रशासनाने ओढ्यावर केलेले सुमारे 9 मीटर अतिक्रमण आणि नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अडथळा तात्काळ हटवावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच मुळा-मुठा नदीवर परवानगीशिवाय बांधण्यात आलेला ‘विश्वराज बंधारा’ हटवण्याचाही ठराव संमत करण्यात आला.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून लोणी काळभोर (ता. हवेली) येथील मुळा-मुठा नदीपात्रालगत अनियंत्रितपणे कचरा टाकला जात होता. काही दिवसांपूर्वी या कचऱ्याला आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर प्रश्न चिघळला आणि प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढला.
नकाशातील रस्ता मोकळा करावा
ग्रामसभेत गट क्रमांक 39 मधील लोणी काळभोर ते थेऊर मार्गावरील नकाशातील रस्ता मोकळा करून नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी शासनाकडे करण्याचेही ठरवण्यात आले. तसेच पाटबंधारे विभागाने ग्रामपंचायतीला दिलेल्या नोटीशीबाबत संताप व्यक्त करत त्याचा निषेध करण्यात आला.
कचऱ्याच्या ढिगांमुळे आरोग्याचा धोका
गेल्या काही दिवसांत कचरा उचलला न गेल्याने लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती परिसरात कचऱ्याचे ढीग साचले होते. त्यामुळे पर्यावरणासह सार्वजनिक आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून स्वतंत्र कचरा प्रकल्प उभारण्याची मागणी करण्यात आली.
“ग्रामसभेत मंजूर ठराव तात्काळ शासनाकडे पाठवून त्यावर त्वरित कारवाईसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. 2 एप्रिलला होणाऱ्या श्री अंबरनाथ देवाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साचलेला कचरा उचलण्यासाठी खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी आमदार माऊली कटके यांच्याकडे कचरा प्रकल्पासाठी शासकीय भूखंडाची मागणी केली जाणार आहे,”
नागेश काळभोर, प्रशासक, लोणी काळभोर.







