पुणे: पुणे जिल्ह्यातील 14 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायत (Local Bodies Election) अशा एकूण 17 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Sharad Pawar) सध्या जोरात सुरू आहेत. भाजप आपली (Pune Election) ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपला प्रभाव टिकवण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. मात्र या दोन्ही पक्षांच्या तुलनेत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उपस्थिती खूपच कमी दिसत आहे. जिल्ह्यातील राजकारणावर अनेक वर्षे शरद पवार आणि त्यांच्या संघटनेचा प्रभाव होता. कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आणि मजबूत संघटना हे त्यांच्या पक्षाचे बलस्थान मानले जात होते. पण या निवडणुकीत पक्षाची उपस्थिती मर्यादित असल्याचं स्पष्ट दिसत आहे. (Pune News)

जिल्ह्यातील 14 नगरपरिषदांपैकी फक्त शिरूर, बारामती आणि सासवड येथेच पक्षाने नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिले आहेत. उर्वरित 11 नगरपरिषदांमध्ये पक्षाने उमेदवारी दिली नाही. लोणावळा, मंचर आणि जुन्नर या ठिकाणी देखील पक्षाने केवळ निवडक प्रभागांमध्येच उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पक्षाची पकड सैल झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, शरद पवारांच्या पक्षाचे दोन खासदार पुणे जिल्ह्यात असूनही त्यांच्या मतदारसंघात आक्रमक प्रचार किंवा व्यापक उमेदवारी दिसत नाही. अमोल कोल्हे यांच्या शिरूर मतदारसंघात फक्त शिरूर नगरपरिषदेतच उमेदवारी आहे, तर सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदारसंघात बारामती आणि सासवड वगळता इतर ठिकाणी उमेदवार दिलेले नाहीत.
दरम्यान, भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गटाची शिवसेना आणि ठाकरे गट सर्वांनी आपल्या नेत्यांची मोठी फौज प्रचारात उतरवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार जिल्ह्यात सभा घेत आहेत. मात्र शरद पवार यांच्या पक्षाकडून मोठ्या नेत्यांचा प्रचारात सहभाग जवळपास दिसत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ताकद जिल्ह्यात कमी झाल्याची चर्चा सुरू आहे.







