पुणे: पुण्यात नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या (Pune Crime) टोळीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला असून, बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक केली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (PDCC) लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत 2 लाख रुपये उकळून बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले होते. (Latest Marathi News)

या प्रकरणात ऋषिकेश गणेश वाघमारे (वय 27, रा. इंदापूर) याला अटक करण्यात आली आहे. कासारवाडी येथील 38 वर्षीय नागरिकाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला. फिर्यादीची पत्नी एम.कॉम शिक्षित असून, तिच्यासाठी नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने आरोपीने संपर्क साधला होता.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने बँकेचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्याशी आपली ओळख असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. यापूर्वी अनेकांना बँकेत नोकरी लावून दिल्याचा दावा करत त्याने एकूण 7 लाख रुपये मागितले होते. त्यापैकी 2 लाख रुपये आधी आणि उर्वरित रक्कम जॉइनिंगनंतर देण्याची अट ठेवण्यात आली.
विश्वास बसावा यासाठी आरोपीने फोनवरून बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोलणे करून दिल्याचा आव आणला. तसेच, ‘असिस्टंट’च्या नावाने पैसे पाठवण्यास सांगितले. प्रत्यक्षात ते बँक खाते त्याच्या पत्नीचेच असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
24 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपीने पीडीसीसी बँकेच्या मुख्य कार्यालयात बोलावून बँकेच्या लेटरहेडवर बनावट अपॉईंटमेंट लेटर दिले. मात्र, त्यावर अधिकृत शिक्का नसल्याने संशय निर्माण झाला. पुढील चौकशीत हे पत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातून नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचे जाळे किती संघटित पद्धतीने काम करत आहे, हे स्पष्ट झाले आहे.







