Baramati Crime : बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील विवाहित महिला सायली जाधव (Sayli Jadhav) हिच्या हत्येच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. देवदर्शनाच्या बहाण्याने कर्नाटकातील कलबुर्गी येथे नेऊन पतीनेच तिचा खून (Murder) केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर मृत महिलेच्या कुटुंबीयांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. (Baramati murder case)

सायली जाधव हिचा 25 मार्च रोजी खून झाला. ती बारामती तालुक्यातील दत्तोबाची वाडी येथील रहिवासी होती. पती अक्षय जाधव याने तिला गाणगापूर येथे देवदर्शनासाठी जाण्याचे सांगून सोबत नेले होते. मात्र दोघांमध्ये आधीपासून वाद सुरू होते. संशयाच्या कारणावरून त्यांच्यात भांडण होत असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेच्या दिवशी अक्षयने सायलीला रस्त्यात कारमधून खाली उतरवले आणि तिच्यावर मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने तिचा गळा चिरल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर जखमी अवस्थेत असताना तिच्यावर कार चालवून तिला ठार मारण्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवरही चर्चेत आला होता.
सायलीच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत सांगितले की, आरोपी पती तिला पैशासाठी त्रास देत होता. घर बांधण्यासाठी आणि वाहन खरेदीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा दबाव टाकत होता. यामुळे सायलीवर मानसिक आणि शारीरिक त्रास होत होता.
या घटनेनंतर कुटुंबीयांनी आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून हा खून पूर्वनियोजित असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







