पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे प्रभाव असलेल्या पुणे जिल्ह्यात (Pune Local Bodies Election) नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये (Pune News) राजकीय रंग चढला आहे. जिल्ह्यातील एकूण 14 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतींपैकी बारामतीतील माळेगाव बुद्रुक नगर पंचायत आणि राजगुरुनगर नगर परिषद वगळता कुठेही महायुती झाली नाही. त्यामुळे भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला मोठे आव्हान दिले आहे. हे आव्हान पेलण्यासाठी अजित पवार यांनी आपल्या सहा नेत्यांना जबाबदारी दिली आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत ते कोणती रणनीती आखणार, याकडे लक्ष लागले आहे.

माळेगाव बुद्रुक येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजप नेते रंजन तावरे यांच्या जनमत विकास आघाडीमध्ये युती झाली असून नगराध्यक्ष पदासह 10 जागा राष्ट्रवादीला आणि 7 जागा आघाडीला देण्यात आल्या आहेत. राजगुरुनगरमध्येही महायुती झाली असून 21 पैकी भाजपने 13 जागा मिळवल्या आहेत. इतर सर्व ठिकाणी भाजप आणि अजित पवार यांच्या पक्षामध्ये थेट सामना आहे.
या पार्श्वभूमीवर पवार यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार शंकर मांडेकर, आमदार सुनील शेळके, आमदार ज्ञानेश्वर कटके, माजी आमदार रमेश थोरात आणि माजी आमदार दिलीप मोहिते यांना स्थानिक पातळीवरील नियोजनाची जबाबदारी दिली आहे. बारामती नगरपरिषदेत राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) आमनेसामने उतरले असून चुरस निर्माण झाली आहे. जेजुरी, भोर, दौंड, शिरूर, इंदापूर, जुन्नर, आळंदी, चाकण आणि वडगाव येथेही भिन्न पक्षांमध्ये सरळ लढत आहे.
काही ठिकाणी मित्रपक्षांमध्येच स्पर्धा निर्माण झाली आहे. भोरमध्ये काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये गेल्याने समीकरणे बदलली आहेत. इंदापूरमध्ये जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी बंड करत स्वतंत्र आघाडी निर्माण केली आहे. शिवसेना दोन्ही गट, राष्ट्रवादी दोन्ही गट, भाजप आणि काँग्रेस अशा अनेक गट-आघाड्यांमुळे संपूर्ण निवडणूक रंगात आली आहे. या सर्व लढतीमध्ये अजित पवार यांच्या सहा शिलेदारांचे राजकीय नियोजन किती यशस्वी ठरेल, हे आगामी निकालात दिसणार आहे.






