प्रतिनिधी अमित मुंडीक
Pune : पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईदरम्यान बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत राऊंड जप्त केले आहेत.

दिनांक ०९ जानेवारी २०२६ रोजी युनिट-४ चे पथक चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मांजरी येथील झेड कॉर्नर, चाळीस फुटी रोड, वेदांत सोसायटी समोरील मोकळ्या जागेत एक संशयित इसम गावठी पिस्टलसह बसलेला आहे. सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांना कळविण्यात आली असता त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार पथकाने वर्णनानुसार संशयित इसमास ताब्यात घेतले असता त्याने आपले नाव आदित्य अमोल ढसाळ (वय २२ वर्षे, रा. वेदांत सोसायटी, मांजरी, पुणे) असे सांगितले. त्याच्या अंगझडतीदरम्यान एक देशी बनावटीची पिस्टल व मॅगझीनमध्ये दोन जिवंत राऊंड असा सुमारे ५२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २७/२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी मांजरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) पुणे शहर श्री. पंकज देशमुख व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-४ गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.





